घरोघरी मातीच्या चुली

"अहो, तुमची पाहुण्यांची यादी झाली का तयार?"
"वेगळी तयार काय करायचीय? तू घे लिहून, मी सांगतो..."
"आता तेवढं एकच काम आहे का मलाऽऽ? सतरा व्यवधानं आहेत. लिहून घे काय? तुम्हीच लिहून द्या मला आज संध्याकाळपर्यंत."
"(आठ्या घालून) आजच्या आज??"
"ओरडताय कायऽऽ? तुम्हाला जराही गांभीर्य कसं नाही हो? वधूपक्ष आहे आपला. सगळी व्यवस्था चोख नको? घरच्या कामात लक्ष कमीच तुमचं पहिल्यापासून. मी आहे म्हणून चाललंय सगळं सुरळीत इतकी वर्षं...!"

----------

"अगं, तुझी पाहुण्यांची यादी दे माझ्याकडे. दोन्ही याद्या एकत्र करतो आणि आजच पत्रिका करायला टाकतो. तेवढंच तुझं एक मोठं काम होऊन जाईल."
"पत्रिका काय करायला टाकतो? तुमचीच यादी द्या इकडे. मला एकदा ती नजरेखालून घालायला नको??"
"(हताशपणे) अगं, ती ‘माझ्या’ पाहुण्यांची यादी आहे ना? मला करायला सांगितलीस ना? तशी केलीय मी. आता तू पुन्हा त्यात काटछाट कुठे करतेस?"
"(संशयास्पद नजरेने) म्हणजे, काटछाट करण्याजोगी नावं आहेत तर त्यात...! आणा तो कागद इकडे."
"अगं, पण..."
"(वैतागून) हे काऽऽऽय? बराक ओबामाचं नाव कशाला टाकलंयत यात??"
"म्हणजे काय! त्याला नको बोलवायला?"
"कशाला?"
"तुझा बॉस आहे तो!"
"काही गरज नाही! घरच्या लग्नाला बॉसची काय गरज?"
"(संधी साधत) इतकी थाटामाटातली लग्नं ही नेहेमी घरचीच असतात ना? की दारच्या लग्नातही तू मिरवतेस एवढी? किती ते कपडे, दागिने...! आणि गरज कशी नाही? आत्ता तो अध्यक्ष असला तरी त्या जागी एके काळी मी काम करत होतो..."
"कामं कमी... ‘इतर’ गोष्टीच जास्त करत होतात... घोडं तिथेच तर पेंड खायचं ना!"
"हे बघ, जुन्या गोष्टी उकरून काढायची काहीही गरज नाही."
"मी काढल्या? मी काढल्या जुन्या गोष्टी उकरून?? सुरूवात तुम्हीच केलीत."
"आता यावरून तू भांडत बसणारेस का माझ्याशी? आता नाहीयेत वाटतं तुला सतरा व्यवधानं?"
"हे अठरावं व्यवधान लावलंयत तुम्ही माझ्यामागे. (ठामपणे) ते काही नाही! बाकी कुठलीही नावं चालतील पण ओबामा नको म्हणजे नको!"
"बाकी कुठलीही नावं चालतील?’
"हो."
"(चाचरत) मो... मो... मोनिका...??"
"(चिडून) तिचं नाव आत्ता घ्यायची काही गरज होती काऽऽ? नाही त्या वेळेला थट्टा कसली करता?"
"(गुळमुळीत आवाजात) थट्टा कुठे? तूच तर म्हणालीस कुठलीही नावं चालतील म्हणून..."
"मला शब्दात पकडू नका!"
"पण ओबामा का नको? मॅडेलीन, माझ्या मंत्रिमंडळातली गृहमंत्री, ती चालते! मग तू ज्याच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री आहेस, तो का नको?"
"सारखे प्रश्न विचारू नका. माझ्याकडे वेळ नाही त्यांची उत्तरं द्यायला. सतरा व्यवधानं आहेत मागे..."

----------

"आज कसं सगळं शांत, शांत वाटतंय."
"चेलू गेली लग्न करून! मला तर फार चुकल्याचुकल्यासारखं होतंय बाई!"
"का? शिक्षण आणि नोकरीनिमित्त ती अनेक वर्षं आपल्यापासून दूरच राहिली आहे ना? आहे तिला सवय..."
"हो, पण तेव्हा तिला संसार नव्हता करायचा! काही लागलं खुपलं तर आपल्याकडे धाव घेऊ शकत होती ती."
"ते तर ती आताही करू शकतेच की..."
"तुम्हाला नाही कळायचं सासुरवाशिणींचं दुःख!"
"मला एक सांग, ओबामाला न बोलावण्यामागेही असलंच काही बायका-स्पेशल कारण होतं का?"
"(आठ्या घालत) तुमच्या डोक्यात तो किडा आहेच वाटतं अजून?"
"नाही, पण..."
"आधीच चेलूनं इंटरकास्ट ठरवलेलं. त्यात तुमचे ते व्याही! फसवणुकीच्या गुन्ह्याखाली तुरुंगवास भोगून आलेले!! ही टेन्शन्स काय कमी होती वर अजून ओबामाला बोलवायला? तो आला म्हणजे कडक सुरक्षाव्यवस्था आली; सगळ्यांच्या पर्सेस, बॅगा, भेटवस्तू उघडून तपासून पाहणं आलं. टी.व्ही. रिपोर्टर्सचंही जास्त लक्ष त्याच्याकडेच लागून राहिलं असतं. मार्क आणि चेलूचा त्याच्याबरोबर काढलेला फोटोच द्यावा लागला असता आज पेपरमधे छापायला. आता हा आपल्या चौघांचा फोटो कसा छान वाटतोय बघायला!"
"(कौतुकानं) तशी तू पहिल्यापासून दूरदृष्टीची आहेसच!"
"(नाक मुरडत) एकदाच फक्त त्या दूरदृष्टीवर झापडं कशी चढली कोण जाणे!"
"कधी ते?"
"उगीच वेड पांघरू नका! त्या मोनिकाला मी विसरलेले नाहीय अजून..."
"आता जुन्या गोष्टी कोण उकरून काढतंय?"
"काढणारच मी! आता माझ्यामागे सतरा व्यवधानं नाहीयेत."

Comments

Deepak said…
खुप मस्त लिहिलंय... सॉलिड.. मजा आली वाचुन.
लिहित रहा.
सुंदर. खुसखुशीत लेख.
Yogesh said…
शॉल्लिड...लिहलय...मजा आली वाचताना!!
Mugdha said…
faar chan idea !!
Gandhali said…
Mastch lihil ahes :)

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)